महदीच्या भावाची कठोर भूमिका
मनोरमा वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मृतक तलालचा भाऊ अब्दुल फत्ताह अब्दो महदी याने यमनचे अॅटर्नी जनरल न्यायमूर्ती अब्दुल सलाम अल हूती यांना पत्र लिहून निमिषा प्रिया यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात त्याने ठामपणे नमूद केले आहे की, त्यांचे कुटुंबीय माफी देण्यास तयार नाहीत आणि ते ‘ब्लड मनी’ (पीडित कुटुंबास नुकसानभरपाई स्वरूपात दिली जाणारी रक्कम) देखील स्वीकारणार नाहीत. त्यांनी "किसास" म्हणजेच शरियत कायद्यानुसार प्रतिशोधाची मागणी केली आहे.
advertisement
काय आहे निमिषा प्रिया प्रकरण?
निमिषा प्रिया या 2008 साली चांगल्या नोकरीच्या शोधात यमनला गेल्या होत्या. त्यांनी सना येथील एका सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम सुरू केले. पुढे अधिक कमाईसाठी त्यांनी तलाल अब्दो महदी नावाच्या यमनी नागरिकासोबत भागीदारीत एक खासगी क्लिनिक सुरू केले.
निमिषा यांचे वकील म्हणतात की, तलालने त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले आणि त्यांचा पासपोर्टही हिरावून घेतला होता. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी निमिषा यांनी तलालला नशेचे औषध दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नंतर तलालचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला होता आणि तो शरीराचे तुकडे करून फेकलेला होता.
भारत सरकारकडून प्रयत्न
या प्रकरणात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निमिषा प्रिया यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र यमनमधील युद्धसदृश परिस्थिती आणि अस्थिर सुरक्षेचा फटका बसला. इंटरनॅशनल अॅक्शन काऊन्सिलच्या प्रतिनिधींनाही यमनमध्ये प्रवेश मिळाला नाही.
भारत सरकार आणि सामाजिक कार्यकर्ते तलालच्या कुटुंबाशी संपर्क करून त्यांची माफी मागण्याचा, तसेच ब्लड मनी देण्याचा प्रयत्न करत होते. पण मृतकाच्या कुटुंबाने ही मदत फेटाळून लावली.
कायद्यानुसार फक्त कुटुंबीयांची माफीच अंतिम
यमनमधील इस्लामिक शरियत कायद्यानुसार फाशीची शिक्षा थांबवण्यासाठी केवळ मृतकाच्या कुटुंबाची माफी आवश्यक असते. पण आता ही माफी नाकारल्यामुळे निमिषा प्रिया यांची शेवटची आशा देखील संपत चालली आहे.
