पीडित युवतीसह तिचा मित्र झाडाखाली गप्पा मारत बसले होते. दुचाकीवर आलेल्या सहा युवकांच्या टोळक्याने लाठीकाठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच हजार रुपये हिसकावले, तर तीन आरोपींनी युवतीवर सामूहिक अत्याचार केला. शिवाय घटनेचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
घटना कशी घडली?
पीडित युवतीने 19 ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने म्हटले की, ती आणि तिचा मित्र मारुती खरात मंगळवारी दुपारी देती संस्थान मंदिराच्या इटोली शिवारात बसले होते. अचानक तेथे येणाऱ्या सहा अनोळखी युवकांनी त्यांच्याकडे लाठीकाठीचा धाक दाखवत पैसे मागितले.
advertisement
यामध्ये एकाने युवतीची बॅग हिसकावली आणि त्यातील पाच हजार रुपये काढले. तर, शेषराव, करण व साबीर नावाच्या तिघांनी युवतीवर आळीपाळीने अत्याचार केला. मुन्ना नावाच्या आरोपीने या घटनेचे व्हिडीओ शूटिंग केले.
पोलिसांकडून तातडीने कारवाई
जिंतूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध तातडीने कार्यवाही करत करण दतराव बुरकुले, शेषराव दतराव शेवाळे, शेख साबीर शेख सत्तार, करण मोहिते व इतर दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये करण बुरकुले, शेषराव शेवाळे, शेख साबीर, मुन्ना टोपे याचा समावेश आहे. तर, करण मोहिते फरार असून, एक आरोपी अल्पवयीन आहे का याची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीसांनी दाखवली सतर्कता
पोलिसांनी या घटनेची चौकशी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतःहून सुरू केली. त्यानंतर आरोपी ताब्यात घेऊन पीडितेचा शोध घेतला आणि तक्रार नोंदवली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहायक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व कार्यवाहीवर नियंत्रण ठेवत मार्गदर्शन केले.