क्राइम ब्रॅंचचे डीसीपी अमित गोयल म्हणाले, ‘कालकाजी पोलिस स्टेशनमध्ये रमेश त्यावेळी बीट ऑफिसर होते. सहसा एकदा बदली झाली की पोलिस नवीन गुन्ह्यांच्या तपासात सक्रीय होतात. रमेश मात्र आपलं काम सांभाळून या गुन्ह्याच्या तपासातही अनौपचारिकपणे कार्यरत राहिले. त्यांनी काही माणसांच्या मदतीने देहविक्री व्यापारात सक्रीय असलेल्या आरोपींची माहिती गोळा करणं सुरु ठेवलं. 2007 मधील त्या घटनेतील आरोपी असलेला सिंह हा हरियाणातील पानीपतमध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी छापे घातले मात्र आरोपी भाड्याच्या घरात राहात असल्याने सतत घर बदलत असल्यामुळे तो सापडला नाही.’ त्यानंतर नुकतीच फेब्रुवारी महिन्यात रमेश यांची बदली क्राईम ब्रॅंचमध्ये करण्यात आली. त्यामुळे ते अधिकृतपणे या गुन्ह्याचा तपास करु शकत होते. डीसीपी गोयल पुढे म्हणाले, ‘रमेश आरोपीचा मोबाईल नंबर मिळवू शकले. भाडेकरुंच्या डेटाबेसमधून त्याची ओळख पटवण्यात आली आणि रोहिणी परिसरातील विजय विहारमधून आरोपीला पकडण्यात आलं,’ अशी माहितीही गोयल यांनी दिली.
advertisement
विरेंद्र सिंह असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील रहिवासी आहे. 2007 मध्ये त्याने आपल्या भाड्याच्या घरात एका 22 वर्षीय तरुणीचा खून केला आणि तिचा मृतदेह एका ट्रंकमध्ये टाकला. तो मृतदेह दुसऱ्या दिवशी पोलिसांना सापडला. डीसीपी अमित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला. तपासादरम्यान त्याचा साथीदार शंकर घोष याला पोलिसांनी अटक केली. 2008 मध्ये न्यायालयाने त्याला गुन्हेगार ठरवलं. तो 1991 मध्ये दिल्लीत आला आणि चित्तरंजन पार्क परिसरात राहू लागल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. तो टॅक्सी ड्रायव्हर होता. त्याच्या कामाच्या निमित्ताने तो अनेकांच्या संपर्कात आला. तशातच त्याला देहविक्रय व्यवसायाची माहिती झाली. पैश्याच्या मोहाने 2001 मध्ये तो या व्यवसायाकडे वळला.
पश्चिम बंगालमधून मुलींना आणून तो त्यांना या व्यवसायात ढकलत होता. मृत तरुणीला त्याने 10,000 रुपयांना खरेदी केलं होतं. 4 जून 2007 ला तिने बरं नसल्यामुळे काम करणार नसल्याचं सांगितलं तेव्हा त्याने तिचा जीव घेतला आणि एका ट्रंकमध्ये भरुन ती ट्रंक आपल्या भाड्याच्या घरात ठेवून तो पळून गेला. 2009 मध्ये तो अंबाला येथे आला आणि पुन्हा देहविक्रय व्यवसायात कार्यरत झाला. 2013 मध्ये पानिपतला जाऊन त्याने तेच काम सुरु ठेवलं. 2019 मध्ये दिल्लीत परत येऊन तो विजय विहार परिसरात राहू लागला. एका पोलिस अधिकाऱ्याच्या तब्बल 17 वर्षांच्या चिवट पाठपुराव्यामुळे तो पकडला गेला आणि मृत तरुणीला न्याय मिळाला.
