हरदोईमधील एका तरुणाने दारु पिऊन हैदोस घालायला सुरुवात केली आहे. येणाऱ्याजाणाऱ्यांवर तो चप्पल उगारतो. महिलांनाही तो सोडत नाही. त्याला कुणी रोखण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांनाही त्रास देतो. नशेत असताना एका विद्यार्थ्याला त्याने चपलेने मारलं. त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी मध्ये पडणाऱ्यालाही त्याने सोडलं नाही. कुणीतरी या प्रकाराचा व्हिडिओ करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला असून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. या तरुणाला लवकरच ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करु असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
advertisement
हरदोईमध्ये सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे मद्यपान करण्याचे प्रकार वाढले आहेत. नशेत होणारी भांडणं आणि मारामाऱ्याही सर्रास होताना दिसतात. हरदोईतील पाली पोलीस स्टेशनच्या परिसरात नशेत असलेल्या तरुणाने विद्यार्थ्याला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये दारु प्यायलेला तरुण रस्त्यावरील नागरिकांशी असभ्य वर्तन करत असल्याचं, त्यांना त्रास देत असल्याचं आणि मारहाण करत असल्याचं दिसत आहे. विद्यार्थ्याला मारहाण करत असताना त्याला वाचवण्यासाठी
मध्ये पडलेल्यांवरही तो चप्पल उगारत असल्याचं दिसत आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिलांनाही तो त्रास देत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पोलिसांचा दरारा नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
हरदोईचे अप्पर पोलीस अधिक्षक मार्तंड सिंह म्हणाले, ‘रस्त्यावरील लोकांना दारुच्या नशेत मारहाण करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत. तरुणाचा शोध सुरु असून त्याची ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल.’
गावात दारुच्या दुकानांबाहेर उभे राहून लोक दारु पिताना दिसतात. नशेत असताना हे लोक इतरांशी असभ्य वर्तन करतात. काही वर्षांपूर्वी हे टाळण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आल्या होत्या, मात्र सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसतं, अशी तक्रार नागरिक करत आहेत.