गाण्याचे बोल तयार करण्यासाठी गीतकार रात्रंदिवस विचार करत असतात. कधी शब्द पटकन सापडतात तर कधी बराच काळ गाणं मध्येच अडकून राहतं. एकदा असंच काहीसं गीतकार शैलेंद्र यांच्या बाबतीत घडलं होतं. ते आपल्या इतर असाइनमेंटमध्ये इतके व्यग्र होते की सचिन देव बर्मन यांच्यासाठी गाणी लिहू शकले नाहीत. त्यामुळे एस.डी. बर्मन भडकले आणि मग एका उत्तम गाण्याचा जन्म झाला.
advertisement
हेही वाचा - कधी होती साधी मॉडेल, बॉलिवूड सोडलं अन् चमकलं स्वदेश फेम अभिनेत्री नशीब,आहे इतक्या कोटींची मालकीण
सचिनदांना राग आला तेव्हा...
ज्या गाण्यामागील गोष्टी सांगितली जात आहे ते गाणं 'काला बाजार' चित्रपटातील आहे. 9 सप्टेंबर 1960 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट विजय आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. देव आनंद, वहिदा रहमान आणि नंदा यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील ‘खोया खोया चांद, खुला आसमां…’ या गाण्याच्या निर्मितीची ही गोष्ट आहे. चित्रपटाच्या कथेनुसार विजय आनंद यांनी सचिनदा यांच्याकडे गाण्याची मागणी केली होती. सचिनदांनी एक छोटीशी धूनही तयार केली होती. गीतकार शैलेंद्र यांनी त्या धूनवर आधारित गाणं लिहावं, अशी त्यांची इच्छा होती. पण, शैलेंद्र इतर गाणी तयार करण्यात इतके व्यस्त होते की त्यांना सचिनदांसाठी गाणं लिहिता आलं नाही. जवळपास एक महिना गाणं लिहिलं गेलं नाही. मुळात रागीट स्वभावाचे असलेले सचिनदा खूप संतापले. त्यांनी आपला मुलगा आर. डी. बर्मन यांना शैलेंद्र यांच्याकडे पाठवलं आणि एका दिवसात गाणं घेऊन येण्यास सांगितलं.
काड्यापेटीतल्या काड्या संपल्या अन्…
आर. डी. बर्मन यांना समोर पाहून शैलेंद्र यांना समजलं होतं की, सचिनदा रागात आहेत. त्यांनी आर. डी. बर्मन यांना सांगितलं की, ते आज गाणं लिहिणार आहेत. शैलेंद्र यांनी आर. डी. बर्मन यांना सोबत राहण्यास सांगितलं. बर्मन दिवसभर शैलेंद्रसोबत राहिले पण गाणं काही पूर्ण झालं नाही. रात्र झाल्यानंतर शैलेंद्र बर्मनला घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर गेले. तिथे शैलेंद्र यांनी सिगारेट ओढत अनवाणी चालायला सुरुवात केली.
यादरम्यान, जेव्हा त्यांच्याकडील काड्यापेटीतील काड्या संपल्या तेव्हा त्यांनी आर. डी. बर्मन यांच्याकडे काही काड्या मागितल्या आणि पुन्हा एकदा गाण्याची धून वाजवण्यास सांगितलं. आरडींनी याच काड्या वापरून काड्यापेटीवर धून वाजवली. शैलेंद्र यांनी लगेच काड्यापेटी घेतली आणि त्यावरच एक मुखवटा लिहिला. काड्यापेटीवरील कागद आरडींकडे दिला आणि उद्या पूर्ण गाणं मिळेल, असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सचिनदांनी गाण्याबद्दल विचारल्यावर आरडींनी काड्यापेटीचा कागद त्यांच्या हातात दिला. सचिनदांचा राग क्षणात नाहीसा झाला आणि शैलेंद्र यांनीही वचन दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पूर्ण गाणं लिहिलं. मोहम्मद रफी यांनी या गाण्याला इतका मनमोहक आवाज दिला की ते गाणं अजरामर झालं…काड्यापेटीवर लिहिलेल्या ओळी होत्या..."खोया-खोया चांद, खुला आसमां, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी, हो...खोया-खोया…"
