भानुमती केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर त्या उत्तम गायिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि संगीतकारही होत्या. त्यांचं करिअर तब्बल 60 वर्षांचं होतं. या काळात त्यांनी एकूण 97 चित्रपटांत काम केलं. त्यापैकी 58 तेलुगू, 34 तमिळ आणि 5 हिंदी चित्रपट होते. त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेमुळे त्या विशेष ओळखल्या जात.
भानुमती यांचा जन्म 7 सप्टेंबर 1925 रोजी आंध्र प्रदेशातील ओंगोल येथे झाला. त्यांचे आई-वडील संगीततज्ज्ञ होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी भानुला संगीताचे धडे दिले. बालवयातच त्या रंगमंचावर सादरीकरण करत होत्या आणि तिथूनच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाची सुरुवात झाली. अवघ्या 13 व्या वर्षी त्यांना 'वर विक्रमायम' या तेलुगू चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
advertisement
भानुमती यांनी लवकरच आपल्या अद्भुत प्रतिभेची छाप पाडायला सुरुवात केली. त्यांच्या काळात एखाद्या चित्रपटाच्या एकूण बजेटपैकी निम्मा भाग फक्त त्यांच्या मानधनावर खर्च होत असे. ‘मल्लेश्वरी’सारखा म्युझिकल ब्लॉकबस्टर असो किंवा ‘कृष्ण प्रेम’सारखा रोमँटिक चित्रपट भानुमतींनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं.त्यांचं वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या चित्रपटांइतकंच रंगतदार होतं. शूटिंगदरम्यान त्यांना असिस्टंट डायरेक्टर रामकृष्ण यांच्यावर प्रेम जडलं. त्यांच्या आई-वडिलांनी या लग्नाला विरोध केला, पण भानुमती यांनी आपल्या प्रेमासाठी घरातून पळून जाऊन लग्न केलं. लग्नानंतरही त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला नाही. ‘स्वर्गसीमा’ हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
भानुमती अभिनयासोबतच संगीत क्षेत्रातही पारंगत होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्वतः गाणी गायली आणि संगीतही दिलं. त्यांच्या आवाजातील भावना थेट मनाला भिडायच्या, म्हणूनच आजही त्यांची गाणी लोकांच्या स्मरणात आहेत. 1953 मध्ये भानुमती यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि ‘चंडीरानी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्या भारतातील पहिल्या महिला दिग्दर्शिका ठरल्या. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर ‘भारणी स्टुडिओ’ची स्थापना केली आणि पती रामकृष्ण यांना दिग्दर्शक म्हणून संधी दिली. त्यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘लैला मजनू’ आणि ‘विप्रनारायण’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
भानुमती यांचं व्यक्तिमत्त्वही तितकंच दमदार होतं. त्यांच्या अॅटिट्यूडच्या कथा आजही ऐकायला मिळतात. एकदा एका रिपोर्टरने विचारलं,“आपण टॉप मेल सुपरस्टार्ससोबत काम करता का?” त्यावर भानुमती म्हणाल्या, “मी त्यांच्यासोबत काम करत नाही, ते माझ्यासोबत काम करतात.” भानुमती यांना 1966 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि 2003 मध्ये पद्मभूषण देण्यात आला. त्यांचं योगदान इतकं महान होतं की 2013 मध्ये भारतीय सिनेमाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत पोस्ट विभागाने त्यांच्या नावाचं विशेष टपाल तिकीटही जारी केलं. 24 डिसेंबर 2005 रोजी भानुमती यांनी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांचे चित्रपट, गाणी आणि आयुष्याची कहाणी आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत.
