मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि जवळपासच्या परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या विकासामुळे जंगलांची संख्या ही कमी होत चालली आहे. त्यामुळे अर्थातच वन्यजीवांना राहण्यासाठी जागा अपुरी होते आहे. त्यामुळे अनेक प्राणी हे रस्त्यावर वावरताना दिसतात. जनसामान्यांच्या मनात प्राण्यांबद्दलची वेगळी भीती निर्माण झाली आहे. परंतु हे प्राणी आपले मित्र असतात आणि ते आपल्याला काहीही करत नाही, असाच काहीसा संदेश देणारे 'संगीत बिबट आख्यान' हे संगीतमय नाट्य सध्या रंगभूमीवर गाजत आहे.
advertisement
माणूस आणि प्राणी यांच्यातील हेवेदावे सोडून त्यांच्यातील मैत्री दाखवणारं हे नाटक मकरंद सावंत याच्या लिखाण आणि दिग्दर्शन संकल्पनेतून तयार झाले आहे. या नाटकाच्या निमित्ताने वन्यवानी नावाची एक नवीन चळवळ निर्माण झाली आहे. या चळवळी अंतर्गत पर्यावरण संवर्धन करणारी अनेक दिग्गज मंडळी विद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण आणि प्राणी विषयावर चर्चा सत्र करतात.
या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि शंका जाणून घेतात. याच 'वन्यवानी' चळवळीचे पहिले पुष्प संगीत बिबट आख्यान नाटक असून भविष्यात वेगवेगळ्या विषयांवर अनेक कलाप्रकार सादर करण्यासाठी ही मंडळी सज्ज झाली आहेत.
पुण्यात घर घ्यायचा विचार करताय, कोणत्या भागात जास्त मागणी, काय आहेत घराच्या किमती?, VIDEO
वन विभागाने या नाटकाला भारतातील पहिलेवहिले "वाईल्ड लाईफ म्युझिकल प्ले" असा दर्जा दिला आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक फक्त चार भिंतींमध्ये होणार नसून कोणत्याही परिसरात शाळा, कॉलेज, मैदान किंवा कोणत्याही हॉलमध्ये या नाटकाचे सादरीकरण होते. तसेच कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा तिकीट या नाटकासाठी आकारले जात नाही.
अनेक पर्यावरण संवर्धन आणि प्राणी संवर्धनासाठी काम करणारी मंडळी या नाटकाला आर्थिक हातभार लावतात. पर्यावरण आणि प्राणी संवर्धन हा विषय घरातील लहानात लहान मुलापासून ते प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. चळवळ यशस्वी व्हावी यासाठी मकरंद सावंत आणि वन्यवानी समुहातील मंडळी प्रयत्नशील आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.