इतिहासात घेऊन जाणारा भव्य सेट
गोरेगावच्या चित्रनगरीत उभ्या राहिलेल्या या सेटच्या फित कापून जेव्हा दारं उघडली, तेव्हा साध्या लाकडी चौकटी आणि मातीच्या भिंतींनी दीडशे वर्षांपूर्वीचा काळ उभा केला. हा केवळ एक सेट नाही, तर त्या काळच्या सामाजिक वास्तवाचं जिवंत रूप आहे. कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हा वाडा साकारला आहे. सावित्रीबाईंनी ज्या घरातून क्रांतीचं पहिलं पाऊल टाकलं, त्या भिंतींमधील प्रत्येक बारकावा इथे जपण्यात आला आहे.
advertisement
सावित्रीबाईंच्या भुमिकेत मधुराणी गोखले
‘आई कुठे काय करते’ मधून घराघरात पोहोचलेली लाडकी मधुराणी गोखले आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. या प्रसंगी ती खूपच भावूक झाली होती. ती म्हणाली, "आज आपण जे मोकळेपणाने श्वास घेतोय, शिकतोय, ते केवळ सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फळ आहे. ही भूमिका साकरणं म्हणजे केवळ अभिनय नाही, तर त्या महान माऊलीला वाहिलेली एक कृतज्ञता आहे. मनात थोडी धाकधूक आहे, पण महाराष्ट्राच्या लेकीची ही गाथा घराघरात पोहोचवण्यासाठी मी सज्ज आहे."
१७ वर्षांनंतर डॉ. अमोल कोल्हेंचं स्टार प्रवाहवर कमबॅक
महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी हा सोहळा दुहेरी आनंदाचा होता. १७ वर्षांपूर्वी ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका त्यांनी स्टार प्रवाहसोबत केली होती, ज्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. आज ते याच वाहिनीवर केवळ अभिनेता म्हणून नाही, तर निर्माता म्हणूनही परतले आहेत. कोल्हे म्हणाले, "जोतीराव म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणारी धगधगती मशाल. त्यांच्या विचारांचा वारसा मांडणं ही मोठी जबाबदारी आहे. आज घराबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची खरी प्रेरणा सावित्रीबाईच आहेत."
'मैलाचा दगड' ठरणारी मालिका - सतीश राजवाडे
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी यावेळी आपला विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, ही मालिका केवळ मनोरंजन नसून समाजाला विचार करायला लावणारा एक आरसा आहे. सावित्रीबाईंचा तो त्याग आणि धैर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे.
