ज्येष्ठ कलादिगदर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे कला आणि सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून आपली भावना व्यक्त केली.
'ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास 30 वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे' अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.
advertisement
तसंच, 'नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा' असं म्हणत राज ठाकरे यांनी नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून श्रद्धांजली अर्पण केली.
