जस्ट नील थिंग्स युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या आयुष्यातील हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "बनवा बनवी रिलीज झाल्यानंतर इतकी तारीफ झाली, इतकं सगळं झालं... तेव्हा मला आठवतंय आम्ही जुहू अपार्टमेन्टमध्ये राहायला होतो. तिथे आम्ही जिथे अंघोळ करायचो तिथला शॉवर खराब झाला होता. मी थंड पाण्याने अंघोळ करणारा माणूस, त्यामुळे बादली भरून घ्यावी लागायची. मी नळ ओपन करायचो, बादली भरली की मग मी अंघोळीला जायचो."
advertisement
पिळगांवकरांनी पुढे सांगितलं, "त्या दिवशी मी आलो आणि बादली भरायला लावली, नळ ओपन केला. पाणी भरतंय तोपर्यंत वाट पाहावी लागते. बादली भरत होती आणि मी विचार करत होतो की, आपल्या हातून पिक्चर चांगला झाला, आपण खूप चांगला पिक्चर बनवला, लोक खूप स्तुती करत आहेत, खूप मोठं सक्सेस मिळालेलं आहे आहे. झालं आपल्याकडून चांगलं काम, आपण चांगलं काम केलेलं आहे. मी स्वत:ला अप्रिशिएट करत होतो. एकटाच होतो ना आत."
"त्यानंतर बादली भरली. मी नळ बंद करण्याचा प्रयत्न केला तर बंद होत नव्हता. मी खूप प्रयत्न केला बंद करण्याचा पण बंदच होईना. मी पॅनिक झालो, मी म्हटलं हे काय झालं, असं का होतंय. नंतर मला रिअलाइज झालं की मी नळाची चावी उलट्या दिशेनं फिरवत होतो. ती बंद नाही होऊ शकणार".
सचिन पिळगांवकरांनी पुढे सांगितलं, "मला जेव्हा ते रिअलाइज झालं तेव्हा मी तो नळ बंद केला आणि मी थांबलो. मी म्हटलं, पिळगांवकर तुम्हाला पाण्याचा नळ बंद करता येत नाही, तुम्ही काय मिजास करताय की एवढा चांगला पिक्चर बनवलाय, एवढा सक्सेसफुल झाला. कुठल्या अँगलने तुम्ही हा विचार करताय. आधी शिका नळ कसा बंद करायचा."
"मी अंघोळ करून बाहेर पडलो तेव्हा मी एक वेगळा माणूस होतो. मी कुठल्या गोष्टीचा विचारच नाही केला. बाबा मला काहीही येत नाही. दरवेळी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर", असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.
