तयारी करून जा, नाहीतर... करीनाला सैफची ताकीद
करीना कपूर ही एक इन्ट्युटिव्ह अभिनेत्री मानली जाते. तिला फार तयारी करायला आवडत नाही. पण 'जाने जान'च्या शूटिंगला जाण्यापूर्वी सैफने तिला सावध केलं होतं. एका मुलाखतीत करीनाने सांगितलं, "सैफ मला म्हणाला होता की, तू ज्यांच्यासोबत काम करणार आहेस, ते अत्यंत तयारी करून येणारे कलाकार आहेत. तू आपली बॅग भरून, मेकअप करून सेटवर जातेस आणि थेट शॉट देतेस, तसं इथे चालणार नाही. तुलाही थोडी मेहनत घ्यावी लागेल, कारण ते दोघे तुला अभिनयात मागे टाकू शकतात." सैफच्या या सल्ल्यामुळे करीना थोडी दडपणाखाली होती, पण या कलाकारांसोबत काम करण्याची तिला प्रचंड उत्सुकताही होती.
advertisement
यावर जयदीपनेही करीनासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. जयदीप म्हणाला, "तुम्ही कितीही तयारी करून जा, पण जेव्हा तुमच्यासमोर करीना कपूर उभी असेल आणि तुम्हाला तिच्या डोळ्यात डोळे घालून वाक्य म्हणायची असतील, तर माणूस सोडा कॅमेराही थरथरतो. मग तुम्ही कितीही मोठे कलाकार असूद्या." जयदीपच्या या वाक्यावर करीना कपूरला हसू आवरणं कठीण झालं होतं. विजय वर्मा करीनाची खिल्ली उडवत म्हणाला, "मला सैफ अली खानचे आभार मानायचे आहेत. कारण तो नसता तर करीनाला माहितच नसतं आम्ही दोघे कोण आहोत!"
करीनाचा स्वीच ऑन-ऑफ मोड पाहून शॉक झाला विजय वर्मा
करीनासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? यावर विजय वर्माने एक भन्नाट किस्सा सांगितला. विजय म्हणतो, "करीनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती स्विच ऑन आणि स्विच ऑफ करण्यात माहिर आहे. आम्ही सेटवर तासंतास जेवणाबद्दल, बिर्याणीबद्दल गप्पा मारायचो. पण जसं दिग्दर्शक सुजॉय घोष 'शॉट रेडी' म्हणायचे, तशी करीना क्षणात बदलून जायची."
विजयने सांगितलं की, करीनाचा तो बदल इतका नैसर्गिक आणि वेगवान असायचा की समोरच्याला काही कळायच्या आत ती पात्रात शिरलेली असायची. गप्पा मारणारी हसरी करीना आणि कॅमेरासमोरची गंभीर 'माया' यात जमीन-अस्मानाचा फरक असायचा.
करीनामुळे रात्री झोपू शकला नाही विजय
करीनाच्या अभिनयाची जादू विजय वर्माला इतकी भावली की त्याला त्या रात्री झोपच लागली नाही. विजय म्हणतो, "एका सीनमध्ये करीनाने केवळ आपल्या डोळ्यांच्या हालचालीने आणि चेहऱ्यावरील सूक्ष्म बदलाने पूर्ण खोलीतलं वातावरण बदलून टाकलं. ती इतकी सुंदर दिसत होती आणि तिचा अभिनय इतका प्रभावी होता की मी थक्क झालो. ती कशा प्रकारे स्वतःला बदलू शकते, हे पाहून मला रात्रभर झोप लागली नाही."
'जाने जान'मध्ये प्रेक्षकांना करीनाचा एक वेगळाच पैलू पाहायला मिळाला. जिथे एकीकडे जयदीप आणि विजय यांची मेथड ॲक्टिंग होती, तिथे करीनाचा नैसर्गिक अभिनय याला तोड नव्हती. सैफने दिलेल्या इशाऱ्यामुळे करीनानेही आपली कंबर कसली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला पडद्यावर दिसलाच.
