रुपाली गांगुलीला अश्रू आवरले नाहीत
सतीश शाह यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि सहकारी उपस्थित होते. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेत सतीश शाह यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी यावेळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
या मालिकेत 'मोनिशा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली यावेळी अत्यंत भावूक झालेली दिसली. आपल्या 'ऑन-स्क्रीन सासऱ्यां'ना निरोप देताना रुपालीला आपले अश्रू आवरणे कठीण झाले आणि ती अक्षरशः ढसाढसा रडताना दिसली.
advertisement
'साराभाई' कुटुंबाचा निरोप
रुपाली गांगुलीसह, मालिकेत सतीश शाह यांच्या पत्नीची 'माया साराभाई' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रत्ना पाठक शाह आणि त्यांचा ऑन-स्क्रीन मुलगा सुमित राघवन यांनीही सतीश शाह यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या सहकलाकाराला आणि मित्राला गमावल्याचे दुःख या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.
सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती
सतीश शाह यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते, त्यामुळे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हे यावेळी खास उपस्थित होते. चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि डोळ्यांतील पाणी त्यांच्या मित्राला गमावल्याचे दुःख स्पष्टपणे दाखवत होते.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेते दिलीप जोशी यांनीही त्यांच्या जुन्या मित्राला अखेरचा निरोप दिला. तसेच, नसीरुद्दीन शाह, सुधीर पांडे, अली असगर, नील नितीन मुकेश यांसारखे अनेक कलाकार सतीश शाह यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित होते. सतीश शाह यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाने एक अष्टपैलू कलाकार गमावला आहे.
