मागील महिन्यात मोठा गाजावाजा करत श्री मलंगगड येथील फ्युनिकुलर रोपवे ट्रॉली सुरू करण्यात आली आहे. पण, आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फ्युनिकुलर रोपवे ट्रॉली चक्क एक तरुण चालवत होता. या तरुणाने इंस्टाग्रामवर रिल काढण्यासाठी हा प्रकार केला होता. रिल केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून रोपवेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात मंगेश भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
advertisement
विनोद पाटील ( राहणार, मलंगगड, ता. कल्याण, जि. ठाणे) असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने मलंगगड फ्युनिकुलर रोपवे प्रकल्पामध्ये कोणत्याही अधिकृत टेक्निशियन, ऑपरेटर किंवा कर्मचारी पदावर कार्यरत नाही, तसंच त्याला फ्युनिकुलर रोपवे ऑपरेटिंग सिस्टीम हाताळण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. असं असतानाही या तरुणाने बेकायदेशीररित्या फ्युनिकुलर रोपवेच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा ताबा घेऊन प्रत्यक्ष चालवली, या घटनेमुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकत होता. या तरुणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असी मागणी स्थानिक रहिवासी मंगेश भोईर यांनी केली.
मंगेश भोईर यांनी मेल करून या घटनेची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसंच, तक्रार पोलीस आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित महाराष्ट्र पोलीस यांच्याकडेही केली आहे.
कशी आहे फ्युनिक्युलर ट्रॉली?
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम भाविकांचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गडावर जाण्यासाठी आतापर्यंत भाविकांना कठीण अशी दोन तासांची चढण चढावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर मलंगगडावर फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतरही रेल्वे प्रत्यक्षात सुरू झाली आहे.
