दूध हे पूर्णान्न असेल तर त्याचं सेवन करताना त्यातली सगळी पोषणमूल्यं टिकून आहेत की नाही, हे बघणं आवश्यक आहे. त्यासाठी दूध तापवण्याची प्रक्रिया अचूक होणं महत्त्वाचं आहे. आज ही प्रक्रिया अचूक कशी करायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही घरी पिशवीतून येणारं दूध विकत घेत असाल तर पिण्यापूर्वी ते तापवून घेणं योग्यच आहे; पण दूध 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उकळू नका. एक ग्लास दूध मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटांत पुरेसं आणि सहज पिता येईल एवढं गरम होतं. त्यामुळे दुधातली पोषणमूल्यंही टिकून राहतात. गाय किंवा म्हशीचं ताजं काढलेलं दूध असेल तर ते चांगलं तापवून नंतर फ्रीजमध्ये ठेवणं हे योग्य आहे; मात्र पिशवीतलं दूध हे आधीच पाश्चराइज केलेलं असल्यामुळे एका वेळी सगळं न तापवता जेवढं पिण्यासाठी किंवा वापरासाठी हवं आहे तेवढंच तापवणं योग्य ठरतं. शिवाय ते उकळवायचं नसून, नुसतं तापवायचं आहे हेही लक्षात असू द्या. दूध उकळवण्यापूर्वी त्यात एक चतुर्थांश पिण्याचं पाणी मिसळा. त्यामुळे दुधातली पोषणमूल्यं टिकून राहण्यास मदत होईल. दूध जास्त वेळ तापवू नका. तापवलेलं दूध उघड्यावर ठेवू नका. तापवलेलं दूध थंड झालं की ते फ्रीजमध्ये ठेवा. एकदा तापवलेलं दूध परत परत गरम करू नका. दूध तापवताना सतत हलवत राहा. दूध तापवण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरू नका.
advertisement
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार डेअरीतज्ज्ञ संजीव तोमर सांगतात, ‘हे सगळं तुम्ही कोणतं दूध वापरता यावर अवलंबून आहे. दिलेल्या सूचनांचं पालन करून तुम्ही कोणत्या प्रकारचं दूध वापरता यावर दूध उकळवायचं की गरम करायचं हे ठरवा. पोषणमूल्यांच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता दुधाचा आस्वाद घ्या.’