एचयूआयडी म्हणजे काय?
सोन्याच्या कलाकृतीवरील हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक उत्पादनाला एक वेगळं वैशिष्ट्य प्रदान करतो. सोन्याच्या वस्तूमध्ये दिलेली शुद्धता प्रमाणित असल्याचंही ते एक लक्षण आहे. सोन्याच्या वस्तूंवर 22-कॅरेट आणि ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे (BIS) लोगो यांसारखे प्युरीटी मार्क्स असणं गरजेचं आहे. भारतात सध्या सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंना हॉलमार्किंगच्या कक्षेत आणण्यात आलं आहे.
advertisement
बीआयएस नियम, 2018च्या कलम 49 नुसार जर ग्राहकानं खरेदी केलेले हॉलमार्क असलेले दागिने चिन्हांकित केलेल्या मार्कपेक्षा कमी शुद्धतेचे आढळले तर, खरेदीदार/ग्राहक नुकसान भरपाईसाठी पात्र असेल. ही भरपाई प्युरीटी मार्कच्या फरकाच्या दुप्पट असेल. अशा विक्री केलेल्या वस्तूंचं, वजन आणि चाचणी शुल्क यांच्यातील शुद्धतेच्या कमतरतेच्या आधारावर गणना केली जाते.
तुम्हाला जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकायचे असल्यास काय होईल?
हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येत नाहीत. तुमच्याकडे जुने हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने देवाणघेवाण किंवा विक्रीसाठी असल्यास, तुम्हाला ते एचयुआयडीसह हॉलमार्क करून घ्यावे लागतील. लक्षात ठेवा की, जर तुमच्या दागिन्यांवर आधीच जुनी किंवा पूर्वीची हॉलमार्क चिन्हं कोरलेली असतील, तर तुम्हाला हॉलमार्किंग प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. अशा प्रकरणांत एचयूआयडी शिवाय सोनं स्वीकारलं जाईल.
याशिवाय, दोन ग्रॅमपेक्षा कमी सोनं, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी असलेले दागिने, परदेशी खरेदीदाराच्या विशिष्ट गरजेनुसार निर्यात करण्यासाठी तयार केलेला कोणताही माल, फाउंटन पेन, घड्याळे किंवा विशेष प्रकारचे दागिने यांना हॉलमार्किंगमधून सूट देण्यात आली आहे. 40 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या ज्वेलर्सनाही या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे.
जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क कसा मिळवायचा?
तुमच्याकडे हॉलमार्क नसलेले जुने सोन्याचे दागिने असल्यास, तुम्ही त्याची शुद्धता तपासू शकता. सामान्य ग्राहक कोणत्याही बीआयएस मान्यताप्राप्त असेयिंग अँड हॉलमार्किंग सेंटर्स (AHCs) मध्ये त्यांच्या हॉलमार्क नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकतात. ग्राहक कोणत्याही बीआयएस-मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रातून दागिन्यांची चाचणी घेऊ शकतात. चाचणी करायच्या वस्तूंची संख्या पाच किंवा त्याहून अधिक असल्यास त्या व्यक्तीला प्रति वस्तूमागे 45 रुपये द्यावे लागतील. जर चार वस्तू असतील तर त्यासाठी 200 रुपये शुल्क असेल. तुम्ही बीआयएसमध्ये नोंदणी केलेल्या ज्वेलर्सद्वारे त्यांचं हॉलमार्क देखील मिळवू शकता. प्रक्रियेसाठी ज्वेलर्स तुमच्या वस्तू किंवा दागिने बीआयएस असेयिंग आणि हॉलमार्किंग सेंटरमध्ये घेऊन जाईल.
सोने शुद्धता चाचणी शुल्क
चार सोन्याच्या दागिन्यांच्या चाचणीसाठी 200 रुपये शुल्क आकारलं जातं. पाच किंवा अधिक वस्तूंसाठी, प्रति वस्तू 45 रुपये शुल्क आकारलं जातं. कोणत्याही बीआयएस-मान्यताप्राप्त एएच केंद्रांची यादी www.bis.gov.in या बीआयएसच्या अधिकृत वेबसाईटवर हॉलमार्किंग टॅब अंतर्गत उपलब्ध आहे.
दागिन्यांवर कोणी हॉलमार्क मिळवला पाहिजे?
निर्माते, घाऊक विक्रेते, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या साखळीतील व्यक्तींनी सोन्याच्या वस्तू किंवा दागिन्यांना हॉलमार्क लावला पाहिजे. संपूर्ण विक्री साखळीमध्ये फक्त एकदाच हॉलमार्किंग केलं पाहिजे. सामान्यपणे, हॉलमार्क लावण्याची जबाबदारी वरील विक्री साखळीतील पहिल्या व्यक्तीची असते.
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, भारतात विकले जाणारे सर्व सोन्याचे दागिने हॉलमार्क केलेले नसतात. त्यामुळे केवळ हॉलमार्क केलेले दागिने विकणाऱ्या नामांकित ज्वेलर्सकडूनच दागिने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.
एचयूआयडी क्रमांक आणण्यापूर्वी, सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगमध्ये चार चिन्हं होते- हीआयएस लोगो, वस्तूंची शुद्धता तसेच ज्वेलर्स आणि A&H केंद्राचा लोगो अशी ती चार चिन्हं होती. आता सहा-अंकी एचयूआयडी हॉलमार्किंगमध्ये फक्त तीन चिन्हं असतात. त्यामध्ये बीआयएस लोगो, वस्तूंची शुद्धता आणि सहा-अंकी अल्फान्यूमेरिक एचयूआयडी यांचा समावेश होतो.