अन्न वारंवार गरम केल्याने केवळ त्याची चवच बदलत नाही, तर त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊन ते विषारी देखील बनू शकते. चला जाणून घेऊया, फ्रिजमधील अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याचे नेमके धोके काय आहेत.
जेव्हा आपण एखादा पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करतो, तेव्हा त्यातील जीवनसत्त्वे आणि प्रथिने उष्णतेमुळे नष्ट होतात. विशेषतः पालेभाज्या आणि डाळींमधील पौष्टिक मूल्ये वारंवार गरम केल्याने शून्यावर येतात. अशावेळी तुम्ही जेवण तर करता, पण तुमच्या शरीराला त्यातून काहीच पोषण मिळत नाही.
advertisement
अनेकजण मानतात की अन्न गरम केल्याने त्यातील जंतू मरतात. पण वास्तव थोडे वेगळे आहे. भात, बटाटे आणि चिकन यांसारख्या पदार्थांमध्ये 'बॅक्टेरिया' खूप वेगाने वाढतात. जर अन्न फ्रिजमधून बाहेर काढून वारंवार गरम करून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवले, तर त्यात हानिकारक विषारी तत्वे तयार होतात. हे बॅक्टेरिया अन्नाला आतून खराब करतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत पण शरीराला प्रचंड घातक असतात.
काही खाद्यपदार्थ पुन्हा गरम करणे अत्यंत धोकादायक मानले जाते.
भात (Rice)
भात पुन्हा गरम केल्याने त्यात 'बॅसिलस सेरियस' नावाचे बॅक्टेरिया तयार होऊ शकतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होऊ शकते.
चिकन आणि अंडी
प्रोटीनयुक्त पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिनांची रचना बदलते, ज्यामुळे पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हिरव्या भाज्या
पालकासारख्या भाज्या पुन्हा गरम केल्यास त्यातील नायट्रेट्सचे रूपांतर कार्सिनोजेनिक तत्वांत होऊ शकते.
आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
वारंवार गरम केलेले अन्न खाल्ल्याने सुरुवातीला पोटदुखी, गॅस, उलट्या आणि जुलाब यांसारखे त्रास जाणवतात. पण जर ही सवय दीर्घकाळ राहिली, तर तुमची पचनसंस्था कायमची कमकुवत होऊ शकते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि तुम्ही वारंवार आजारी पडू शकता.
जर तुम्हाला उरलेले अन्न वापरायचेच असेल, तर खालील खबरदारी नक्की घ्या:
अन्न नेहमी हवाबंद डब्यातच फ्रिजमध्ये ठेवा.
फ्रिजमधून फक्त तेवढेच अन्न बाहेर काढा जेवढे तुम्हाला खायचे आहे. संपूर्ण डबा बाहेर काढून पुन्हा गरम करून उरलेला भाग परत फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका.
फ्रिजमधील अन्न शक्यतो 24 तासांच्या आत संपवावे.
अन्न गरम करताना ते व्यवस्थित वाफ येईपर्यंत गरम करा, जेणेकरून त्यातील सूक्ष्म जंतू नष्ट होतील.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
