जाणून घेऊयात जेवणानंतर शतपावली घालण्याचे फायदे आणि शतपावलीची सुयोग्य पद्धत
शतपावली कशी घालावी ?
रात्रीचं जेवण झाल्याच्या किमान 20 मिनिटांनी शतपावलीला सुरूवात करावी. कारण जेवल्यानंतर लगेच चालण्यामुळे पोटात जडपणा जाणवू शकतो आणि पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. पोटातून आतड्यांपर्यंत अन्न जाण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ पुरेसा आहे. जेवल्यानंतर तुम्हाला थोडी सुस्ती आली असेल किंवा आराम करावा वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ घेऊ शकता. मात्र रात्रीचं जेवणं झाल्यानंतर 1 तासाच्या आत शतपावली घालणं फायद्याचं ठरतं.
advertisement
किती वेळ शतपावली घालावी?
जेवणानंतर शतपावली घालणं हे फायद्याचं आहे. मात्र तुम्हाला आवड असेल तर तुम्ही जास्तवेळ सुद्धा चालू शकता. मात्र चालताना हे लक्षात ठेवा की तुमचं चालणं हे सामान्य असेल. भरभर चालल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्रीचं जेवण झाल्यावर तुम्ही साधारण 20 ते 40 मिनिटांचा वॉक घेऊ शकता.
रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किंवा चालण्याची योग्य पद्धत जाणून घेतल्यानंतर आता पाहुयात शतपावलीचे फायदे.
रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारण्याचे फायदे
वजन कमी होतं:- रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने कॅलरीज बर्न होतात त्यामुळे अतिरिक्त चरबी जळून वजन कमी व्हायला मदत होते.
पचन सुधारतं:- रात्री चालण्याने पचनक्रिया सक्रिय होते, त्यामुळे अन्न सहज पचायला मदत होते. त्यामुळे पचनाचे विकार आणि बद्धकोष्ठतेसारखे गंभीर आजार टाळता येतात.
डायबिटीसवर नियंत्रण:- नियमित चालण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते हे आपल्याला माहितीच आहे. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे रात्री चालल्याने खाल्लेलं अन्न पचतं त्यामुळे रात्री रक्तात साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे रात्री चालणं किंवा जेवणानंतर शतपावली घालणं हे डायबिटीस असलेल्यांसाठी प्रचंड फायद्याचं आहे.
हृदयाचं आरोग्य सुधारतं:- चालल्यामुळे शरीरातल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे फॅट्स आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं. त्यामुळे रक्तप्रवाह कोणताही अडथळा न आल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्याचा थेट फायदा हृदयाला होऊन हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते.
चांगली झोप येते :- रात्री चालल्याने रक्तप्रवाह सुधारतो ज्याचा अप्रत्यक्ष फायदा हा मेंदूलाही होतो. त्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारून मेलाटोनिन हार्मोन स्रवायला मदत होते. ज्यामुळे चांगली झोप येऊ शकते.
तणाव कमी होतो:- असं म्हणतात चालणं हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. चालण्यामुळे मन फ्रेश राहायला मदत होते. त्यामुळे मानसिक ताण दूर करण्यासाठी चालणं सर्वोत्तम पर्याय आहे.