नैसर्गिक शेतीकडे वळताना शेतकऱ्यांनी घाई न करता टप्प्याटप्प्याने बदल करणे अधिक फायदेशीर ठरत आहे. सर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब, अन्नद्रव्यांची पातळी आणि मातीचा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा वापर अचानक बंद न करता हळूहळू कमी करून शेणखत, कंपोस्ट, जीवामृत, घनजीवामृत व गोमूत्रावर आधारित द्रावणांचा वापर वाढवावा, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
जिद्द असावी तर अशी, न बोलताही फुलतोय व्यवसाय, दादरमधील बॅगवाले काकांची कहाणी
बियाण्यांची निवड आणि प्रक्रिया ही नैसर्गिक शेतीतील महत्त्वाची बाब मानली जाते. देशी बियाण्यांची बीजप्रक्रिया केल्यास पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि उगवणही चांगली होते. यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच रासायनिक औषधांवरील अवलंबित्व घटते, ज्यामुळे शेतीखर्चात लक्षणीय बचत होते.
नैसर्गिक शेतीत पीक नियोजन आणि व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे. आंतरपीक, मिश्रपीक आणि पीक फेरपालट या पद्धतींचा अवलंब केल्यास जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन राखले जाते. तण नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांऐवजी मल्चिंग, आच्छादन पिके आणि हाताने निंदणी यांचा वापर केला जातो, ज्यामुळे मातीचा कस टिकून राहतो.
सुरुवातीच्या एक-दोन हंगामात उत्पादन थोडे कमी वाटू शकते, मात्र नैसर्गिक शेतीमुळे खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. काही वर्षांत जमिनीची सुपीकता वाढल्याने उत्पादन स्थिर होते. शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने ही शेती दीर्घकाळ शाश्वत आणि फायदेशीर ठरत असल्याचे अनेक यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव सांगतात.





