साहित्य
1 कप वरई / भगर
1 कप पाणी
चवीनुसार मीठ
1 कप ताक
2 चमचे शेंगदाण्याचा कूट
2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस
हिरव्या मिरच्या (आवडीनुसार, बारीक चिरलेल्या)
2 चमचे साबुदाण्याचे पीठ
1 उकडलेला बटाटा
1 चमचा शेंगदाण्याचे तेल
तळण्यासाठी तेल
कृती
सर्वप्रथम 1 कप वरई किंवा भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. नंतर एका पॅनमध्ये 1 कप पाणी घ्या, त्यात चवीनुसार मीठ घाला आणि गॅसवर ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात धुतलेली भगर आणि 1 कप ताक घाला. हे मिश्रण मंद आचेवर भगर पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवून घ्या. भगर शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण एका भांड्यात काढून थंड होऊ द्या.
advertisement
मिश्रण थंड झाल्यावर त्यात 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला. त्यानंतर 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आणि आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. आता 2 चमचे साबुदाण्याचे पीठ मिसळा. साबुदाण्याचे पीठ नसेल, तर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही ते घरीच तयार करू शकता.
यानंतर 1 उकडलेला बटाटा किसून या मिश्रणात घाला. सर्व साहित्य हाताने किंवा चमच्याने नीट एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण हाताला जास्त चिकटत असेल, तर त्यात 1 चमचा शेंगदाण्याचे तेल घाला. जर मिश्रण कोरडे वाटत असेल, तर आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालू शकता.
आता हे मिश्रण एका ताटात काढून नीट मळून घ्या. मळलेले मिश्रण छोटे गोळे करून त्यांना मेदूवड्याप्रमाणे मधोमध छिद्र देऊन आकार द्या. दुसरीकडे कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर हे वडे सावकाश तेलात सोडा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
वडे हलके लालसर आणि कुरकुरीत झाल्यावर तेलातून काढा. गरमागरम उपवासाचे कुरकुरीत मेदूवडे तयार आहेत. हे वडे दही, उपवासाची चटणी किंवा ताकासोबत दिले तर त्यांची चव आणखी खुलते. उपवासात काहीतरी वेगळं आणि खास बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
