तुमच्या स्वत:च्या आणि पक्षाच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रिमंडळ बैठका या जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या मंत्र्यांना सुनावले आहे.
चोर मचाये शोर, आदित्य ठाकरे यांच्याकडून समाचार
असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. बैठकीला गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर!
advertisement
निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडतायेत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!
पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत. कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…! असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना डिवचले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना झापले
महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला. सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदी मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली. त्यावर उल्हासनगरमध्ये तुम्ही आधी सुरुवात केली, असे सांगत सेना मंत्र्यांची तोंडं मुख्यमंत्री फडणवीस यांनी गप्प केली.
