पुणे विभागात पावसाच्या सरींची शक्यता
हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक 'ट्रफ' (कमी दाबाचा पट्टा) तयार होत आहे. यामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. जरी हा पाऊस मोठा नसला, तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा ठरेल.
advertisement
उत्तर वाऱ्यांमुळे पुन्हा हुडहुडी
सध्या उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे वारे 'बर्फीले' आणि थंड आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली असून रात्रीचा गारवा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात पारा काहीसा घसरल्याने पुन्हा एकदा थंडीची जाणीव होत आहे. पुढील २४ ते ४८ तास ही स्थिती कायम राहील.
तामिळनाडूत मुसळधार; दक्षिण भारतात संकट
महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असली, तरी दक्षिण भारतात मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार होत असून त्याचे रूपांतर 'वेल मार्क लो प्रेशर'मध्ये होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक तडाखा तामिळनाडू आणि श्रीलंका या भागांना बसेल. १७ आणि १८ फेब्रुवारीला तामिळनाडूच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये आणि केरळमध्ये ६० ते ८० मिमी पावसाची शक्यता असून, तिथे पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
१६ तारखेपासून महाराष्ट्राच्या आकाशात ढगांची गर्दी वाढण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. द्राक्ष, आंबा मोहर आणि रब्बीच्या पिकांवर ढगाळ हवामानामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. १७-१८ तारखेच्या संभाव्य पावसाचा अंदाज घेऊनच काढणीची कामे नियोजित करावीत.
