रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अति मनुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. वर्धा, नागपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
मुंबईसह, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. मुसळधार पाऊस असल्याने अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तर ट्रेनही 10-15 मिनिटं उशिराने चालत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना लवकर पडा. सोबत सुका खाऊ ठेवा असं आवाहन करण्यात आलं आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र पुन्हा एकदा पावसानं जोरदार आगमन केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाहीतर दुबार पेरणीचं संकट होतं. मात्र मागच्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा चांगला जोर धरला आहे. त्यामुळे आता पाणीप्रश्न आणि दुबार पेरणीचं संकट टळणार आहे.
मुंबईसह कोकणात अधून-मधून कोसळधारा सुरू असतानाच हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरच्या परिसरांना रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांनाही रेड अलर्ट आणि नागपूर, वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.