पारनेर तालुक्यातील दरोडी शिवारात सेनवियान या कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. कंपनीच्या कार्यालयात राजेंद्र घुले हे सुरक्षा रक्षक म्हणून आहेत. ते मंगळवारी कार्यालयात असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार आणि त्याच्यासोबत सात ते आठजण तेथे आले. पवार याने घुले यांना खुर्चीवरून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तू येथे कसे काम करतोस? असे पवार सुरक्षा रक्षकाला म्हणत मारहाण केली.
advertisement
दोन लाख दे, नाहीतर प्रकल्प बंद करेन, अजितदादांच्या नेत्याची धमकी
दरोडी शिवारात सेनवियान या कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यांच्यासह काही गुंडांनी धुडगूस घालत संगणक, टेबलची तोडफोड केली. तसेच सुरक्षा रक्षकाचा मोबाइल फोडला. पवनचक्की चालवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये मला द्यावे लागतील, असे तुझ्या मालकाला सांग, अशी धमकी पवार याने दिली. त्यानंतर पवार याने सुरक्षा रक्षकाच्या खिशातील २२ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. यापूर्वीही अनेकदा विकास पवार यांनी धमकावले होते. येथे काम करणारे आम्ही कर्मचारी आहोत, असे आम्ही समजून सांगितले. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याच्या सोबत आमदार काशिनाथ दात्ते यांचे शासकीय PA अशोक आहेर यांनी कंपनीला फोनवरून अनेकदा कंपनीच्या कार्यालयात जाऊन धमकावले असल्याचा आरोप कंपनीचे देखभाल करणारे चंद्रभान ठुबे यांनी केला आहे.
विषय मोठा नाही, त्यावर बोलणार नाही- पोलीस निरीक्षक
या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी या प्रकरणासंदर्भात मला काही बोलायचे नाही. हे प्रकरण मोठं नाहीये की त्यावर मी बोलावे असे म्हणत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस या प्रकरणामध्ये आरोपींना पाठीशी घालताय का अशी शंका आहे.
आमदार म्हणाले, मला अधिक माहिती नाही, माहिती घेऊन बोलतो
या प्रकरणांमध्ये पारनेरचे स्थानिक आमदार काशिनाथ दाते यांचे स्वीय सहाय्यक अशोक आहेर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष यांचे नाव आल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात विषयी मला कुठलीही माहिती नाही असे ते म्हणाले. माहिती घेऊन बोलणे उचित ठरेल. माहिती घेऊन बोलतो, असे त्यांनी सांगितले.
