हा बालसरपंच निवडण्यासाठी प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचे पालन करण्यात आले. यामध्ये उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार करणे आणि मतदान यांसारख्या सर्व टप्प्यांचा समावेश होता. या प्रक्रियेतून सार्थकची निवड करण्यात आली. सार्थकने आपल्या एका दिवसाच्या कार्यकाळात जबाबदारी आणि नेतृत्वाचे उत्तम उदाहरण सादर केले.
कार्यभार स्वीकारल्यानंतर, सार्थकने गावातील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्याने गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांचा आढावा घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याने शाळेसाठी तत्काळ १७ कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शाळेच्या स्वच्छतेत सुधारणा होईल.
advertisement
ग्रामपंचायतीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी, सदस्यांनी आणि शिक्षकांनीही मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि नेतृत्वगुण यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, असे ग्रामस्थांनी सांगितले. 'छोटा सरपंच, मोठं काम' या उपक्रमाची खरी ओळख ठरली, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या उपक्रमाच्या यशानंतर, पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. हा अभिनव प्रयोग इतर गावासाठी एक प्रेरणा ठरू शकतो.