नद्यांना आलेल्या रौद्र रुपामुळं गावात आणि शेतात पाणी शिरलं, या पाण्यासोबत संसार आणि पीकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यानं काबाडकष्ट करून उभं राहिलेलं पीक अक्षरक्षा मातीमोल झालंय. यामुळं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूचा महापूर दाटलाय. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरमध्ये जाऊन विविध ठिकाणी पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केला. अजित पवारांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या सर्व आमदार, खासदारांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे ठरवले आहे.
advertisement
शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या एक्स(पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावर देण्यात आली आहे.
नेमकं काय लिहिलंय परिपत्रकात?
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मानवी जीव, घरे, जनावरे, शेतजमिनी व खरीप-बागायती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कठीण काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार सर्व मंत्री, खासदार, आमदार, आमदारपरिषद सदस्य यांनी तातडीने एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे ठरवले आहे. हीच खरी जनसेवा आहे. या कठीण काळात एकत्र उभं राहून महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त बांधवांना नवजीवन देण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.
शेतकरी एकटा नाही, सरकार ठामपणे पाठीशी
सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीनं पिकांची नासधूस झाली आहे. पुरात शेतकरी बांधवांचे संसार वाहून गेल्याचं दृश्य अधिकच मनाला वेदना देणारं आहे. पशुधनाचं देखील फार नुकसान झालं. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना धीर देणं हे माझं काम आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना सावरण्यास बळ मिळेल. पुराच्या पाण्यात घरांचं, व्यवसायाचं व संसारिक झालेल्या नुकसानाचं दुःख हे आभाळाएवढं आहे. पण या कठीण प्रसंगी आपलं हक्काचं महायुती सरकार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शिलेदार मदतकार्य पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत. ह्या आपत्तीच्या काळात माझा शेतकरी एकटा अजिबात नाही; सरकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.
पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान
सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून सुरू केला. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश दिले.