अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच झाला, असा दावा अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तर पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी अपघाताबाबतच्या अनेक त्रुटी पुराव्यांसह पत्रकार परिषदेत मांडल्या आहेत. त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीवर देखील विविध प्रकारचे आरोप केले. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी हे देखील सातत्याने अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
advertisement
आता त्यांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. राजीव गांधींप्रमाणेच अजित पवारांची हत्या करण्यात आली का? अजित पवारांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? असा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. ते अकोला येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
अमोल मिटकरी नक्की काय म्हणाले?
अकोला जिल्ह्यातील पारस फाटा येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलताना मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, "जो वैमानिक होता कपूर त्याची मद्यप्राशन केल्याची हिस्ट्री होती. हा वैमानिक सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? राजीव गांधींच्या वेळी जसे एक मुलगी सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती. तसाच हा सुसाईड बॉम्बर म्हणून कपूर आला नसेल ना? जर पायलट सुमित कपूरची पत्नी तो जिवंत असल्याचे सांगत असेल, तर अपघातात नक्की कोणाचा मृत्यू झाला? या विमान अपघाताबाबत एवढे मोठे गूढ असताना संपूर्ण महाराष्ट्र इतका शांत कसा असू शकतो?"
'त्या' दोन कॅप्टन्सचे सीसीटीव्ही कुठे आहेत?
अजित पवारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मिटकरींनी आधीच्या वैमानिकांचा उल्लेख केला. "नेहमी अजितदादांसोबत असणारे कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे नेमक्या कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते? ते सध्या कुठे आहेत? त्यांचे सीसीटीव्ही फुटेज का समोर आणले जात नाहीत? गोजूबावीच्या माळरानावर घडलेला हा प्रसंग म्हणजे न उलगडलेले गूढ आहे," अशी शंका त्यांनी व्यक्त केली. 'ब्लॅक बॉक्स'चा डेटा आणि विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यास शासन का घाबरत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
