केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित कामाचे उद्घाटन, पद्मश्री विखे पाटलांच्या पुतळ्याचे अनावरण आणि कोपरगाव येथे कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी रविवारी सकाळी अमित शाह यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच भाजपचे आमदार उपस्थित होते.
advertisement
बदललेल्या दादांच्या रुपाचा प्रत्यय
अमित शाह यांच्या साई दर्शनावेळी भाविक भक्तांची मंदिरात मोठी गर्दी होती. शाहांच्या सोबत राज्याचे जवळपास अर्धा डझन मंत्रीही होते. त्यामुळे मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. शाहांचे दर्शन आटोपल्यानंतर नेते मंत्री मंदिराबाहेर पडत असताना भाविकांनी मंत्र्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. अजित पवार यांच्याही समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. राज्यभरातून आलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी हेरून अजित पवार यांनी धावत धावत जाऊन लोकांशी हस्तांदोलन केले. रांगेत उभे असलेले भाविक, युवा वर्ग आणि लाडक्या बहिणींशी हात मिळवून बदललेल्या दादांचा प्रत्यय त्यांनी दाखवून दिला.
दौरा अमित शाहांचा पण जलवा अजितदादांचा
अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार यांच्या वादळी हस्तांदोलनाची चर्चा होती. केवळ अर्ध्या-एक मिनिटांत त्यांनी रांगेत उभे असलेल्या लोकांशी अत्यंत जलद गतीने हस्तांदोलन केले. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी आपल्याशी हस्तांदोलन केले, याचा साहजिक आनंद राज्यभरातून आलेल्या भाविकांना झाला. अजितदादांनी आज मन जिंकले, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.
'आता तुमचा दादा बदललाय!'
गेल्या काही काळापासून ठरवून अजित पवार यांनी आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मग सभा संमेलनात कार्यकर्त्यांसोबत फोटो काढणे असो, लाडक्या बहिणींशी हस्तांदोलन असो वा बोलण्यात मवाळपणा असो... आता तुमचा दादा बदललाय, असे स्वत:च अजित पवार सांगत आहेत. नव्या पिढीशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्नही यानिमित्ताने अधोरेखित होताना दिसतो. बोलण्यातली दादागिरी आणि स्वभावातल्या फटकळपणाला त्यांनी काहीही मुरड घातलेली दिसून येते. परंतु तरीही कधीकधी त्यांच्या स्वभावातले मूळ गुण उफाळून येतात हे ही तितकेच खरे...!