पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं, यावरून आता भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राम शिंदेंनी केला आहे.
advertisement
सभापती राम शिंदे हे दहिहंडीच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर होते. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरोप केले आहेत. तसेच अजित पवार शिळ्या कढीला ऊत का आणत आहेत? असा सवाल देखील केला आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील राम शिंदे यांनी केली आहे. अजित पवार राहून राहून सांगत आहे मी मदत केली तर मी कसं म्हणणार मदत नाही केली, असे देखील राम शिंदे म्हणाले.
राम शिंदे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर 'बेट्या, मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं', असे रोहित पवारांना उद्देशून वक्तव्य केले. त्यानंतर अजित पवारांनी दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी मी असं बोललोच नाही असे म्हणाले. पुन्हा काल त्यांनी कबुल केले. अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अजित पवार राहून सारखा शिळ्या कढीला का ऊत आणत आहे? का कबुली देत आहे?
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात चर्चा करावी: राम शिंदे
महायुतीच्या घटक पक्षातील सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका ती पण सार्वजनिक व्यासपीठावर मांडणे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्त्व चर्चा करू शकतात. मी अधिक काही बोलणार नाही. मात्र मी या सगळ्याचा बळी ठरलो आहे. ६२२ मताच्या फरकाने माझा पराभव झाला आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार करुन अजित पवार मला टॉर्चर करत आहे. सातत्याने मला नाउमेद करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली पाहिजे, असे राम शिंदे म्हणाले.
