मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी दत्तापूर पोलीस ठाण्यात डॉ. आकाश येंडे यांनी माहिती दिली की, गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे या तरुणाला मृतावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. मृतक गणेश वारंगणे हा त्याची आई दुर्गा वारंगणे आणि मनोज किर्तने यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचं समोर आलं. त्यामुळे या दोघांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. या कटात अमोल अर्जुने आणि अशोक चवरे या दोघांचाही सहभाग होता.
advertisement
नेमकी हत्या कशी केली?
घटनेच्या दिवशी ७ ऑक्टोबरला सकाळी आरोपी गणेशला मोटरसायकलवर बसवून आसेगाव परिसरातील शेतात नेलं आणि निर्दयी मारहाण करून हत्या केली. मृतकाच्या मामाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केवळ काही तासांत चारही आरोपींना ताब्यात घेतलं.
चारही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दत्तापूर पोलिसांच्या तत्पर आणि अचूक तपासामुळे अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा झाल्याने नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे.