मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा गावात घडली आहे. येथे एक 77 वर्षीय वृद्ध महिला एकटी राहते, त्यांची दोन मुलं कामानिमित्त बाहेर राहतात, तर दोन मुलं शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहायला आहेत. अशात एकट्या राहणाऱ्या महिलेवर गावकाऱ्यांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे. आरोपींनी वृद्ध महिलेची जादूटोण्याच्या संशयावरून धिंड काढली आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना संपूर्ण गाव केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. काळमी नंदराम शेलूकर असं या पीडित वृद्ध महिलेचं नाव आहे.
advertisement
घटनेच्या दिवशी पीडित महिला पहाटे चार वाजता उठून शौचास गेली होती. यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या शेजारी राहणाऱ्या काहीजणांनी तिला पकडलं आणि दोरखंडाने बांधून ठेवलं. तिला लोखंडी साखळीचे चटके, मिरचीची धुरी दिली आणि तोंडाला काळं फासत धिंड काढली आहे. यावेळी आरोपींनी पीडित महिलेला मानवी मूत्र पाजल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार गावचा पोलीस पाटील बाबुभाई नावाच्या इसमाने केल्याची तक्रार आहे
30 डिसेंबर रोजी ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेनं आपल्या मुलांसह सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. यानंतर पीडित महिलेची मुलं राजकुमार शेलुकर आणि शामू शेलुकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आईच्या छळाची माहिती दिली, यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनोरी येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती. यांच्या चार एकर शेतात गावातील पोलीस पाटलांनी थेट अंगणवाडी देखील बांधल्याचा आरोप शेलूकर बंधूंनी केलेला आहे. वृध्द महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहितेनुसार काही गुन्हे दाखल करण्यात केली आहेत. मात्र जादू टोना कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणाचे संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जादूटोणा संदर्भात गुन्हे लावले जातील, असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितलं.
