बाग तोडून शेती विकण्याचा विचार
परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची आठ एकरांची संत्रा बाग आहे. गेली दहा वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करत असूनही त्यांना उत्पन्नात फारसा फायदा होत नव्हता. खर्च वाढत चालला होता आणि उत्पादन मात्र घटत होतं. परिणामी, संत्रा बाग तोडून शेती विकण्याचा विचार विजय बिजवे यांनी केला होता.
advertisement
मुलाने केला AI चा वापर
मात्र त्यांच्या मुलाने, जो B.Sc. Agriculture शिकलेला आहे, त्यांनी या निर्णयाला विरोध केला आणि शेवटचा प्रयत्न म्हणून AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह केला. विजय बिजवे यांनी मुलाच्या सल्ल्यानुसार शेतीचे गुगल मॅपिंग करून घेतले आणि ‘Map My Crop’ या पुण्याच्या कंपनीच्या साहाय्याने मायक्रो सेन्सर बसवले.
या सेन्सरच्या माध्यमातून बिजवे यांना त्यांच्या जमिनीतले पाणी, ओलावा, तापमान, मातीतील पोषणतत्त्वे आणि पीक वाढीबाबत अत्यंत अचूक माहिती मिळू लागली. या माहितीच्या आधारे त्यांनी झाडांना आवश्यक तेवढेच पाणी, खते व औषधे वापरली. परिणामी खर्चात बचत झाली आणि फळांची वाढ अधिक गुणात्मक झाली.
पूर्वी एका झाडावर 200-300 संत्री मिळत होते, आता ती संख्या 800 ते 1200 फळांपर्यंत पोहोचली आहे. पूर्वी आठ एकर बागेसाठी 5.5 लाख रुपये खर्च आणि 5-6 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. पण AI वापरल्यावर खर्च 4 लाखांपर्यंत कमी झाला आणि उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये होण्याची शक्यता आहे.
जैविक फवारणीचा उपयोग
याशिवाय, विजय बिजवे यांनी झाडावर येणाऱ्या मावा रोगावर रासायनिक फवारणी टाळून गूळ, साखर व दूध मिश्रणाची सेंद्रिय फवारणी केली. यामुळे मधमाशांचा वावर वाढला आणि परागसिंचन (pollination) सुधारले. परिणामी, फळगळ थांबली आणि फळांची गुणवत्ता अधिक चांगली झाली.
विजय बिजवे यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. मात्र त्यांनी शेवटी एक मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे की, “उत्पादन वाढलं, पण मार्केटिंग यंत्रणा नाही. व्यापाऱ्यांच्या मर्जीनं दर द्यावा लागतो.” त्यामुळे त्यांनी अमरावती जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प, थेट मार्केट जोडणी आणि वाहतुकीसाठी द्रुत व्यवस्था निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. शेतीतील AI चा हा प्रयोग म्हणजे बदलत्या कृषी व्यवस्थेची नांदी आहे, जे शेतीला फायदेशीर बनवू शकते.
