मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जळगावचे तत्कालिन एसपी प्रवीण मुंढे यांनी आपल्याला अनिल देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
advertisement
काय म्हणाले प्रविण मुंढे?
'विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांनी मला फोन केला. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील. त्यानंतर प्रविण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबद्दल सांगितलं. अनिल देशमुखांचे आदेश आहेत, एफआयआर दाखल करा, असं चव्हाण यांनी सांगितलं', असं प्रविण मुंढे म्हणाले.
'मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जायला सांगितलं. कारण ते सांगत असलेला घटनाक्रम जळगाव हद्दीत नव्हता. पण तसं करण्यास तक्रारदाराने नकार दिला. पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला. त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवतो असं सांगितलं, मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराकडून पाठपुरावा आणि थेट गृहमंत्र्यांचा फोन यामुळे मी संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी, आयजी कायदा-सुव्यवस्था, पोलीस महासंचालक यांना सांगितला', असं प्रविण मुंढे यांनी सांगितलं.
'पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला, त्यांनी मला धमकावलं. एका एफआयआरसाठी तीन वेळा फोन का करावा लागतो, असं त्यांनी मला विचारलं. सातत्याने गृहमंत्री धमकावत असल्याने अखेर गुन्हा दाखल केला. कोणतीही घाई नसताना झिरो एफआयआर केवळ अनिल देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आला. शिवाय 3 वर्ष विलंब झालेला होता', असं प्रविण मुंढे म्हणाल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
