आज अशोक खरातला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच दरम्यान, अशोक खरातच्या 'शिवनिका' संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला मोर्चा थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे वळवला असल्याचा दावा करणारे वृत्त समोर आले होते. चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स धाडण्यात आल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे चाकणकरांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे म्हटले जात होते.
advertisement
मात्र, या सगळ्या समन्सच्या चर्चांवर खरात प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीमधील सूत्रांनी मोठी अपडेट दिली आहे. खरात प्रकरणातील चौकशीसाठी अद्याप रुपाली चाकणकर यांना कोणतेही समन्स बजावले नाही. चाकणकर यांना समन्स बजावल्याची चर्चा एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.
रुपाली चाकणकर अडचणीत...
खरातशी असलेल्या कथित संबंधांमुळे रुपाली चाकणकर आधीच वादाच्या भोवऱ्यात होत्या. चाकणकर यांना राज्य महिला आयोग आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. 'शिवनिका' संस्थेतील त्यांची भूमिका आणि खरातसोबतचे व्यवहार यावर प्रश्न उपस्थित झाले होते. खरातच्या या अघोरी साम्राज्याला कोणाचे वरदहस्त होते, याची चर्चाही सध्या रंगली आहे.
'शिवनिका'च्या नावाखाली काय शिजलं?
अशोक खरातने स्थापन केलेली 'शिवनिका' संस्था आता एसआयटीच्या पूर्णपणे रडारवर आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद कार्यक्रम पार पडल्याचा पोलिसांना संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संस्थेवर विविध काळात कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता 'कुंडली' काढली जाणार आहे. या सर्वांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असून, खरातला मिळालेले राजकीय पाठबळ आणि निधीचा स्रोत यावर पोलीस लक्ष केंद्रित करत आहेत.
