भोंदू अशोक खरात याच्या फसवणुकीच्या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. त्याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचले आहेत. खरात आपले कोट्यवधींचे हवाला रॅकेट चक्क मुंबईतील एका आलिशान हॉटेलमधून चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड खरातचा सीए (CA) ललित पोफळे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
advertisement
२५ हजारांचा 'सूट' अन् ३६५ दिवस बुकिंग!
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये खरातने एक विशेष 'सूट' कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे २५ हजार रुपये असून, वर्षाचे ३६५ दिवस ही रूम खरातच्या नावावर आरक्षित असायची. याच आलिशान खोलीतून हवाला व्यवहारांच्या मोठ्या डील फायनल केल्या जात असत. इतक्या मोठ्या रकमेचे भाडे भरण्यासाठी हा पैसा कुठून येत होता, याचा तपास आता एसआयटी (SIT) करत आहे.
दुबई कनेक्शन आणि सीएचा 'मास्टरस्ट्रोक'
या सर्व रॅकेटचा खरा सूत्रधार खरातचा अत्यंत जवळचा असलेला सीए ललित पोफळे असल्याचे समजते. पोफळे यानेच खरातच्या बेकायदेशीर पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि हवालामार्फत व्यवहार करण्यासाठी पूर्ण जाळे विणले होते. या व्यवहारांचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत जोडले गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परदेशात किती पैसा पाठवण्यात आला आणि त्यात कोणाकोणाचे हितसंबंध आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी आता या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि पाहुण्यांच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली असून, सीए ललित पोफळे याच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. या मोठ्या खुलाशामुळे नाशिकसह मुंबईच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
