पाळू गावची कन्या अश्विनी केदारी ही 2023 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली होती. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र तिचा हा लढा अपयशी ठरला. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे अश्विनी अभ्यास करायला उठली होती. अभ्यास करत असताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. पाणी किती गरम झाले आहे, हे पाहण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली असता, हीटरचा शॉक लागून उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. या भीषण अपघातात ती तब्बल ८० टक्के भाजली. तिला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.
कलेक्टर व्हायचं स्वप्न अपूर्ण
अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च येत असल्याने खेड तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी पुढे येऊन तिला आर्थिक मदत केली. मात्र, सर्वांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न होते. तिने त्या दिशेने जोरदार तयारी सुरू केली होती. परंतु, नियतीने तिचा घात केला. तिचं कलेक्टर व्हायचं स्वप्न अपूर्णच राहिले. एका शेतकरी कुटुंबातून येऊन, जिद्दीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या अश्विनीच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.