मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात 5 लाखांनी घटली आहे. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. तर, जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 लाख आहे. या योजनेसंबंधी पडताळणी सुरू झाल्याने नव्याने सर्वे होणार आहे. ती जबाबदारी पुन्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर देण्यात आली आहे.
advertisement
मात्र अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे गावात महिलांमध्ये भांडणे लागतील.महिलांची नावे कमी करण्याचे काम आम्ही करणार नाही.
लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी प्रति अर्ज पन्नास रुपये प्रमाणे सरकारने मानधन देण्याचे मान्य केले होते. मात्र अद्याप पर्यंत ती रक्कम मिळालेली नाही. ती देण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
लाडक्या बहिणींचे अपात्रतेचे निकष ठरवून देत येत्या 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून महिला बालविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
1-चारचाकी आढळल्यास योजनेतून अपात्र
2-लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 च्या दरम्यान असावे
3-कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे
4-कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, आयकर भरणारा
5-संजय गांधी निराधार योजनेसारखे अन्य योजनेचा लाभ घेणारा नसवा
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यावर वक्तव्य करत राज्य सरकारचा निषेध करत सरकारला खडेबोल सुनावले. लाडक्या बहिणींचा सर्वेक्षणावर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला हे बरोबर आहे. यामुळे गावातील महिलाचे नाव अंगणवाडी सेविका कापणार तर गावात भांडणे लागणारच. मते घ्यायला तुम्ही आणि, भांडण करायला अंगणवाडी सेविका. तुम्हाला ज्या महिलांना अपात्र करायचे आहे त्यासाठी सर्वे करायला भाजपचा जिल्हाप्रमुख आमदार यांना पाठवावे, अशी खोचक टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
