अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. कडू यांना शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेचा दाखला देऊन त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे विभागीय सहनिबंधक यांनी सांगितले.
भाजपविरोधात दंड थोपटले, यापेक्षा मोगलाई बरी होती...!
बच्चू कडू यांचे बँकेचे अध्यक्षपद गेल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपविरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केली. हम करे सो कायदा ही भाजपची शैली राहिलेली आहे. आमच्याविरोधात कुणी बोलायचे नाही. आम्हाला कुणी प्रश्न विचारायचे नाही. आमच्याविरोधात बोलाल तर ठेचून काढू, असे भाजपने नेहमी केले. मात्र आम्ही घारबरण्यांपैकी नक्कीच नाही. आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत आणि शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत आम्ही लढत राहू. भाजपच्या अशा राज्यापैकी मोगलाई बरी होती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
advertisement
शांत राहिले तर तुम्ही टिकून राहाल, अशा धमक्या मिळालेल्या पण आम्ही...
शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन छेडल्यानंतर तुम्हाला घेरले जाईल. तुमचे अध्यक्षपद धोक्यात येईल, असे आम्हाला आधीच अनेकांनी सांगितले होते. शेतकरी आंदोलनाचे परिणाम आम्हालाही माहिती होते. शांत राहिले तर तुम्ही टिकून राहाल, असे सांगत अनेकांकडून धमकाविण्याच्या गोष्टी सुरूच होत्या. परंतु तरीही आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढाई लढली. अशीच लढाई शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी लढू, असे आश्वस्त करताना ज्यांच्यापुढे आमची सुनावणी झाली ते एका मंत्र्याचा नातेवाईक आहेत. या निर्णयाविरोधात आम्ही अपील करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
एकीकडे शेतकऱ्यांसाठी उपोषण, दुसरीकडे अध्यक्षपद गेले, टायमिंगची चर्चा
शेतकऱ्यांसाठी उपोषण करून कर्जमाफीचा मु्द्दा ऐरणीवर आणल्याने सध्या बच्चू कडू यांची राज्यात चर्चा सुरू आहे. त्याचवेळी त्यांचे अध्यक्षपद गेल्याने, दोन्ही घटनांच्या टायमिंगची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
