बच्चू कडू यांचे मागील ७ दिवसापासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपोषण सुरु होते. सहा दिवसांच्या आंदोलनानंतर महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत कर्जमाफीबद्दल आश्वासन दिले तसेच उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा पाहून शासनाने उद्योगमंत्री उदय सामंत यांना बच्चू कडू यांना चर्चा करण्यासाठी पाठवले. शनिवारी उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तुमच्या मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचे सांगत दिव्यांगांच्या मानधनवाढीवर येत्या ३० जून रोजी निर्णय घेणार असल्याचे सांगून शेतकरी कर्जमाफीबद्दल समिती स्थापन करू, असे शासनाने मान्य केले असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
advertisement
सरकारला घाम फोडणारी नवी घोषणा, फडणवीस अजितदादांना म्हणाले...
दिव्यांगाला महिन्याला १५०० रुपयांचा निधी अपुरा पडतो आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्यात पिचून गेला आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफीची गरज आहे. सरकारने आश्वासन दिले होते. परंतु त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला होता. आपल्या आंदोलनाने कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आला असे म्हणावे लागेल. कारण आम्ही आश्वासन दिलेच नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफीवर बोलतच नव्हते. आपल्या आंदोलनाने अजित पवार यांनी समिती नेमण्याची घोषणा केली. शिवाय कर्जमाफी विषयावर चकार शब्दही न काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कर्जमाफीवर बोलावे लागले. आपल्या आंदोलनाने बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. आंदोलने केवळ मागण्या पूर्ण झाल्या की नाही, यापुरतीच मर्यादित नसतात. तर आपल्यासाठी लढणारे कुणीतरी आहेत, हे दाखविण्याकरिताही आंदोलन असते. आपल्या आंदोलनाने शेतकरी दिव्यांगाना नक्कीच धीर आला असेल, असे बच्चू कडू म्हणाले.
...तर २ ऑक्टोबरला मंत्रालयात घुसू
शेतकरी कर्जमाफीची विषय क्लिष्ट आहे, याची मला जाण आहे. समिती नेमू, असे सरकारने सांगितलेले असले तरी सरकार तारीख सांगत नाही. सरकार तारीख सांगत नसले तरी आमचे ठरले आहे, सरकारला आम्ही २ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम देऊ. जर कर्जमाफीची मागणी मान्य झाली नाही तर २ ऑक्टोबरला मंत्रालयात घुसू, अशी धडकी भरवणारी घोषणा बच्चू कडू यांनी केली. बच्चू कडू यांनी उपोषण सोडल्याने उद्या होणारे चक्का जाम आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
