हाके म्हणतात, मी कोणत्याही पक्षाचा नाही...
लक्ष्मण हाके यांनी आपली उमेदवारी जाहीर करताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "मी सध्या कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही आणि कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. मी केवळ माझ्या ओबीसी बांधवांसाठी आणि बारामती मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय-हक्कासाठी ही निवडणूक लढवत आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण मैदानात उतरल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
सुनेत्रा पवारांच्या 'बिनविरोध'च्या प्रयत्नांना मोठा धक्का
दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर सुनेत्रा पवार महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी कालपासूनच सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर अशा बड्या नेत्यांना फोनाफोनी सुरू केली होती. मात्र, लक्ष्मण हाके यांच्या एन्ट्रीमुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या आहेत. उद्या, ६ एप्रिल रोजी लक्ष्मण हाके आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल होणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे बारामती पोटनिवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंगत आली असल्याचे म्हटले जात आहे.
बारामतीतील राजकीय समीकरणे बदलणार?
बारामती विधानसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. लक्ष्मण हाके यांनी सातत्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर रान उठवले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पोटनिवडणूक होणार असल्याच्या शक्यतेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली तयारी सुरू केली आहे.
