मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आणि शिलाबाई हे दांपत्य हातोला गावात शेतीकामासाठी सालगडी म्हणून वास्तव्यास होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. याच वादातून सुरेशने रागाच्या भरात शिलाबाईला काठीने मारहाण केली. या मारहाणीत काठीचा जोरदार घाव शिलाबाईच्या डोक्यात बसल्याने ती गंभीर जखमी झाली. उपचार न मिळाल्याने किंवा जखम गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
advertisement
कसं फुटलं बिंग?
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पतीने हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले आहे. शिलाबाईचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचत सुरेशने मृतदेह अंबाजोगाई तालुक्यातून थेट नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील आलुरा या मूळ गावी नेला. तेथे अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेह घेतला ताब्यात
दरम्यान, या संशयास्पद मृत्यूबाबत बर्दापूर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाली करत थेट आलुरा गाव गाठले. मृतदेहाची पाहणी केली असता शिलाबाईच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
याप्रकरणी पोलिसांनी सुरेश शेरफुले यालाही ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरू आहे. बर्दापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कौटुंबिक हिंसाचाराचा हा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
