नेमकी घटना काय?
धारूर तालुक्यातील बिभीषण गणपती गायके हे सराफा व्यवसायिक दर शनिवारी डिघोळअंबा गावात दागिने विक्रीसाठी जातात. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ते आपल्या दुचाकीवरून जुन्या होळ मार्गाने डिघोळअंबा शिवारातील दर्ग्याजवळ पोहोचले होते. याचवेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या २० ते २५ वयोगटातील चार तरुणांनी गायके यांची दुचाकी अडवली.
त्यांनी काही कळायच्या आतच व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. डोळ्यांत मिरचीपूड गेल्याने गायके यांना काहीही दिसणं अशक्य झाले. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग हिसकावून तातडीने पोबारा केला. या बॅगेत सोन्याचे गंठण (१२ ग्रॅम), झुंबर (४ ग्रॅम), कानफुले आणि मंगलसूत्र असे एकूण ५ लाख ८५ हजार रुपयांचे मौल्यवान दागिने होते.
advertisement
रुमालाने बांधले होते चेहरे
पीडित व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लुटारूंनी आपले चेहरे रुमालाने बांधले होते. वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सराफा व्यावसायिकाला लुटल्याची ही बीडमधील पहिलीच घटना नाही. यापूर्वी माजलगावमध्ये असाच प्रकार घडला होता. आता ही दुसरी मोठी घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
