आरोपींनी लाठी-काठी आणि कुऱ्हाडीच्या दांड्यांनी मारहाण केली. आरोपींनी घरातील महिलांनाही सोडलं नाही. त्यांनी घरात घुसून पीडिताच्या मुलीला मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी एका मुलीला जबरदस्तीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, त्यांची तक्रार घेतली नसल्याचा दावा पीडिताने केला आहे.
advertisement
वसुदेव विक्रम आंधळे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हल्लेखोरांनी वसुदेव यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीला मारहाण केली आहे. यावेळी घरातील काही महिला आक्रोश करत होत्या, तरीही आरोपी लाकडी दांड्याने मारहाण करत होते. यावेळी पीडिताच्या एका मुलीने भांडणात पडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका आरोपींनी संबंधित मुलाला पळवून पळवून मारहाण केली आहे. यानंतर या मुलीला जबरदस्तीने विष देखील पाजल्याचा आरोप वसुदेव आंधळे यांनी केला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वसुदेव आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीने एका आरोपीविरोधात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. हीच तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून आंधळे कुटुंबावर दबाव टाकला जात होता. ही तक्रार मागे न घेतल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याचं वसुदेव आंधळे यांनी सांगितलं. तसेच मारहाण करणारे आरोपीही पैशावाले असून त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा फौजफाटा आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत टोळकं पीडित कुटुंबाला बेदम मारहाण करताना दिसत आहे.
