नसिक छळ करत असल्याचं स्पष्टपणे नमूद
काही दिवसांपूर्वी सचिन जाधवर यांनी कपीलधार परिसरात आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यांच्या कारमध्ये पोलिसांना मडक्याचे तुकडे आणि एक सुसाईड नोट सापडली होती. या चिठ्ठीत त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे हे मानसिक छळ करत असल्याचं स्पष्टपणे नमूद केले होते. अवेळी कॉल करणे आणि कामाचा नाहक त्रास देणे या कारणांमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे जाधवर यांनी त्यात लिहिले होते.
advertisement
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
सुसाईड नोट असूनही सहा दिवस पोलीस कारवाई करत नसल्याने जाधवर यांचे आई, भाऊ आणि पत्नी आक्रमक झाले. त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेतली आणि सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. नातेवाईकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आणि वाढता दबाव पाहून पोलिसांनी प्रदीप फाटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत...
या आंदोलनावेळी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ मुंडे आणि भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांना धारेवर धरले. जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही असा पवित्रा सर्वांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. अखेर उशिरा रात्री या प्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला.
छळामागील नेमकं कारण काय?
दरम्यान, आरोपी प्रदीप फाटे हे मूळचे जालना कार्यालयात कार्यरत आहेत, मात्र त्यांच्याकडे बीडचा अतिरिक्त चार्ज आहे. नियमानुसार त्यांनी जालना येथून कारभार पाहणे अपेक्षित असताना, फाटे यांनी बीडमध्येच आपले बस्तान बसवले होते. या प्रकरणी फाटे यांची बाजू अद्याप समजू शकली नाही, मात्र आता पोलीस या छळामागील नेमकं कारण काय होतं, याचा सखोल तपास करत आहेत.
इतरांची चौकशी होणार
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जीएसटी अधिकारी जाधवर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फाटेसोबत आणखी कोण जाहावर यांना त्रास देत होते, याचा उलगडा पोलिस तपासात होणार आहे. त्यामुळे लवकरच कार्यालयातील इतरांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
