बाळू हिरामण जौंजाळे असे या व्हायरल झालेल्या आजोबांचे खरे नाव आहे. पंचक्रोशीत ते भाऊ या नावाने ओळखले जातात. मात्र, सायकल टूरमधील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते सर्वत्र आप्पा म्हणून प्रसिद्ध झाले. पुणे शहरात नुकत्याच पार पडलेल्या पुणे अँड टूर या सायकल स्पर्धेबाबत आप्पांना उत्सुकता होती. मात्र, स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची नेमकी प्रक्रिया व पात्रता त्यांना माहिती नव्हती. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याचे समजून ते हिंजवडी फेज-तीन येथील स्पर्धा शुभारंभ स्थळी पोहोचले.
advertisement
तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावर ते म्हणाले, मी शेकडो किलोमीटर सायकल चालवतो. मला देखील स्पर्धेत जाऊ द्या, मी शंभर टक्के ही स्पर्धा पूर्ण करणार. मात्र, नियमांमुळे त्यांना अधिकृत सहभागी होता आले नाही. स्पर्धक सायकलस्वारांचा ताफा पुढे गेल्यानंतर पोलिसांनी त्यांची सायकल सोडली. त्यानंतर आजोबा अत्यंत उत्साहाने आणि आत्मविश्वासाने स्पर्धा मार्गावर सायकल चालवू लागले.
हिंजवडी–मारुंजीसारख्या आयटी क्षेत्रातील परिसरात आलिशान वाहनांची रेलचेल असतानाही आजोबा आजही रोजच्या प्रवासासाठी सायकललाच प्राधान्य देतात. पंचक्रोशीतील सुख-दुःखाच्या कार्यक्रमांना, सण-उत्सवांना ते सायकलवरूनच जातात. लहानपणापासून सायकल चालवण्याची सवय आजही त्यांनी जपली आहे. आजोबांचा मुलगा दीपक जौंजाळे यांनी व्यायामासाठी आधुनिक सायकल आणली होती, मात्र ती सायकल आज आजोबाच नियमित वापरतात.
व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना आजोबा हसत सांगतात, लहानपणापासून सायकल चालवतो. स्पर्धेबद्दल आधीच माहिती होती म्हणून तिकडे गेलो. पुण्यात सगळीकडे सायकलनेच फिरतो. माझं नाव बाळू आहे, पण आता मुलं आप्पा म्हणतात. मी त्यांना हरवलं असतं, पण नको म्हणाले म्हणून मागे राहिलो. त्यांच्या या साध्या पण आत्मविश्वासपूर्ण बोलण्याने अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
दरम्यान, आप्पांचा मुलगा दीपक जौंजाळे यांनी सांगितले की, आम्हालादेखील कल्पना नव्हती की वडील तिकडे जाणार आहेत. पोलिसांनी आधी त्यांना थांबवले होते, पण नंतर त्यांनी पूर्ण राउंड केला. सुमारे 4 ते 4.30 तासांत त्यांनी तो पूर्ण केला. सगळीकडे कौतुक होत आहे, गावाचंही नाव मोठं होत आहे, याचा खूप अभिमान वाटतो. सायकल टूरमधील ‘व्हायरल आप्पा’ यांनी वयाच्या सत्तरीतही उत्साह, फिटनेस आणि सकारात्मकतेचा जो संदेश दिला आहे, तो आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.





