रूढी–अंधश्रद्धेला दिला फाटा, पाचव्या दिवशीच केला विधी पूर्ण, वृक्षारोपणातून मातृस्मृती जपणारे भानुसे कुटुंब Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
समाजात पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना छेद देत, मानवी संवेदना, व्यवहारिकता आणि पर्यावरणपूरक विचारांचा आदर्श घालून देणारा निर्णय भानुसे कुटुंबियांनी घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : समाजात पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना छेद देत, मानवी संवेदना, व्यवहारिकता आणि पर्यावरणपूरक विचारांचा आदर्श घालून देणारा निर्णय भानुसे कुटुंबियांनी घेतला आहे. देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक, समीक्षक व सामाजिक-राजकीय विश्लेषक डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांच्या मातोश्री तसेच प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच नारायणराव सखाराम भानुसे यांच्या पत्नी चंद्रलेखा नारायणराव भानुसे यांचे 17 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी अत्यंत साध्या आणि सुसंस्कृत पद्धतीने जिजाऊ वंदना सादर करून पार पाडण्यात आला. त्यानंतर पाचव्या दिवशीच, म्हणजे 21 जानेवारी 2026 रोजी, रक्षाविसर्जनासह सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. केवळ पारंपरिक कर्मकांडांपुरते न थांबता, मातोश्रींच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले आणि गोडजेवण करून त्या दिवशीच सर्व विधी संपन्न करण्यात आले.
advertisement
सामान्यतः 13–14 दिवस चालणाऱ्या पारंपरिक विधींमुळे नातेवाईक, सगेसोयरे अडकून पडतात, अनेक ठिकाणी लग्न किंवा अन्य महत्त्वाचे कार्यक्रम स्थगित करावे लागतात, आर्थिक आणि मानसिक अडचणी निर्माण होतात ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. हे योग्य नाही, असा स्पष्ट आणि पुरोगामी विचार मांडत, मराठा सेवा संघाच्या विचारधारेशी निष्ठा राखणारे साहित्यिक व समीक्षक डॉ. शिवानंद भानुसे यांनी समाजासमोर हा पर्याय मांडला.
advertisement
या निर्णयाला वडील नारायणराव सखाराम भानुसे, बहिण शिवगंगा सुभाष म्हस्के, शिवकन्या दिनेश पडघान, सुशीला अशोक नरवाडे, काका भगवान सखाराम भानुसे, काकू सुनिता भगवान भानुसे यांच्यासह सर्व कुटुंबीयांनी एकमताने दुजोरा दिला. त्यामुळे सर्वांसाठी सोयीस्कर, आधुनिक आणि मानवतावादी असा निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यात आला.
डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत तिची मनापासून काळजी घेतली पाहिजे, प्रेम दिले पाहिजे, जपले पाहिजे तेच खरे महत्त्वाचे आहे. व्यक्ती गेल्यानंतर कर्मकांडांपेक्षा तिच्या आठवणी जिवंत ठेवणारे कृतीशील कार्य महत्त्वाचे आहे. लोकांना अडचणीत आणण्यापेक्षा चौथ्या किंवा पाचव्या दिवशीच विधी पूर्ण करून वृक्षारोपणासारखा सकारात्मक संदेश समाजाला दिला पाहिजे.
advertisement
या प्रसंगी पंचक्रोशीसह संपूर्ण महाराष्ट्र, तसेच देशभरातून आलेले नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भानुसे परिवाराचा हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता, समाजाला विचार करायला लावणारा आणि नवा मार्ग दाखवणारा ठरला आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 8:31 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
रूढी–अंधश्रद्धेला दिला फाटा, पाचव्या दिवशीच केला विधी पूर्ण, वृक्षारोपणातून मातृस्मृती जपणारे भानुसे कुटुंब Video






