बीड - व्यवसाय सुरू करताना सुरुवात ही कमीत कमी खर्चामध्ये असावी म्हणून आजकाल प्रत्येक व्यवसायिक प्रयत्नशील असतात. कारण कमी गुंतवणूक करून व्यवसायामध्ये प्रगती होऊ लागली तर हळूहळू भांडवल देखील वाढवता येते. याच विचारातून एका व्यक्तीने दूध व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायातून ते वर्षाला 8 ते 9 लाख रुपयांची कमाई करत आहेत. हे त्यांनी नेमके कसे साध्य केले, जाणून घेऊयात ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
रंजीत मस्के असे या व्यक्तीचे नाव आहे. ते मागील तीन वर्षांपासून दूध विक्रीचा व्यवसाय करत आहेत. दूध विक्रीच्या माध्यमातून त्यांना अगदी चांगले उत्पन्न मिळत असून त्यांनी या व्यवसायामध्ये स्वतःला झोकुन दिले आहे. या व्यवसायामध्ये येण्याआधी ते आपल्या शेतीमध्ये पालेभाज्याचे उत्पन्न घ्यायचे. मात्र, पालेभाज्यांच्या माध्यमातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
रंजीत मस्के हे डोंगराळ भागामध्ये राहत असल्याने शेतीमध्ये फारसे उत्पन्न मिळवण्यात ते अयशस्वी ठरत होते. परंतु त्यांनी दूध हा व्यवसाय निवडला आणि व्यवसाय मध्ये ते यशस्वी ठरले. सुरुवातीला त्यांनी एक म्हैस विकत घेतली आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या सुरुवातीला त्यांनी एकच म्हैस विकत घेतली होती. मात्र, हळूहळू दूध विक्री वाढू लागली आणि रंजीत मस्के यांना आपला व्यवसाय अजून कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिले.
त्यातूनच त्यांनी काही दिवसानंतर त्यांनी अजून 3 म्हशी विकत घेतल्या आणि व्यवसायामध्ये वाढ करून मोठ्या प्रमाणात दूध विक्री करू लागले. सद्यस्थिती पाहता त्यांना या व्यवसायाच्या माध्यमातून अगदी चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यांच्याकडे आता 4 म्हशी असून या दूध विक्रीच्या व्यवसायातून ते वर्षाला 8 ते 9 लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.