भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर, आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर–नार्वेकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
advertisement
शेवटच्या दिवशी पुण्यात मात्र भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. पुण्यातील स्थानिक नेत्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचे समर्थक असलेल्या तीन नगरसेवकांची भाजपनं उमेदवारी कापली आहे. मेधा कुलकर्णी यांची मुलगी देखील यंदाची निवडणूक लढण्यास इच्छुक होती. मात्र पक्षानं कुलकर्णी यांच्या मुलीची उमेदवारी कापली आहे.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या भावाचंही तिकीट कापण्यात आलं आहे. आपल्या नातेवाईकांना तिकीट मिळावं म्हणून संबंधित नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. आपला डाव यशस्वी होईल, अशी आशा संबंधित नेत्यांना होती. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपनं मोठा धक्का दिला आहे. नेत्यांच्या संघर्षात भाजपच्या अनेक नगरसेवकांचा देखील बळी गेला आहे. त्यामुळे भाजप पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
