वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्रामप्पा पाटील यांनी गुरुवारी रात्री वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार
दिवंगत सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी, अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटील यांच्या निधनाने तालुक्यातील एक संघर्षशील आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सिद्रामप्पा पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांनी गावच्या सरपंचपदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्षे संचालक आणि एकवेळ उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
सहकार क्षेत्रातही त्यांचं योगदान मोठं होतं. त्यांनी श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले. याशिवाय त्यांनी मार्केट कमिटी सभापती म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. अक्कलकोट तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा वाटा उचलला.
