मुंबईत प्रभाग क्रमांक २०२ मधून मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करीत श्रद्धा जाधव यांच्याविरोधात घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 'फायर आजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजींनीही निषेध नोंदवला.
साहेबांनी असे का केले? तिलाच पुन्हा तिकीट का दिले?
"उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन आम्ही श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ नका. त्यांच्या तीन चार टर्म झालेल्या आहेत. त्यांच्या ऐवजी शाखाप्रमुख विजय इंदलकर यांना उमेदवारी द्या, असे सांगितले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी पुन्हा श्रद्धा जाधव यांनाच उमेदवारी दिली. साहेबांनी असे का केले? तिलाच पुन्हा तिकीट का दिले? निष्ठावंतांवर हा अन्याय आहे. किती वेळा तोच तोच उमेदवार देणार?" अशा उद्विग्न भावना फायर आजींनी व्यक्त केल्या.
advertisement
शाखाप्रमुख विजय इंदुलकर इच्छुक होते, तयारीही केली होती पण...
श्रद्धा जाधव यांच्या प्रभाग क्रमांक २०२ मधून शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख विजय इंदुलकर हे इच्छुक होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते शाखाप्रमुख म्हणून काम करतात. यंदा उमेदवारी देऊन पक्षाने आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु पक्षाने पुन्हा एकदा श्रद्धा जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून अखेरच्या क्षणी त्यांना एबी फॉर्म दिला.
लालबागमध्येही ठाकरेंना धक्का, कोकीळ शिंदेसेनेत
प्रभाग क्रमांक २०४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिल्याने अनिल कोकीळ हे नाराज झाले होते. प्रभाग क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ यांनी उमेदवारी मागितली होती. सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चाही झाली. परंतु ऐनवेळी कोकीळ यांच्या नावावर फुली मारून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी मिळणार नसल्याने कोकीळ यांनी लागलीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संपर्क करून पक्षप्रवेशाची बोलणी केली. पुढच्या तासाभरात एबी फॉर्म मिळवून त्यांनी अर्ज भरला. लालबाग हा खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक दशकांपासून इकडे शिवसेनेचा नगरसेवक निवडून येतो. परंतु पक्षफुटीनंतर आता सेना विरुद्ध सेना अशी लढत लालबागमध्ये होणार असल्याने मुंबईची अतिशय उत्कंठावर्धक लढत होणार असल्याचे जाणकार सांगतात.
