नागपूर : सख्ख्या भावांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका भावाचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलशन नगर भागात ही घटना घडली आहे. विजय यादव असं मारेकरी भावाचं नाव आहे. घरामध्ये वाद झाल्यानंतर विजय यादव आणि राजू यादव या दोन भावांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली. या हाणामारीमध्ये विजयने राजूची हत्या केली.
advertisement
जेवण करताना वाद झाला
संध्याकाळी घरात जेवण सुरू असताना दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला, यानंतर दोघांनी एकमेकांना शिव्या द्यायला सुरूवात केली. भावाने शिव्या दिल्यामुळे संतापलेल्या विजयने राजूवर विळ्याने हल्ला केला, ज्यात राजू गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेमध्येच राजूला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात भरती केलं गेलं, पण उपचारादरम्यान राजू यादवचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून विजय यादव याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करत आहेत.
रामभाई कुंभलाल यादव यांची दोन मुले विजय आणि राजू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यात विजय यादव याने राजू यादवला विळ्याने मारहाण केली, यात राजू गंभीर जखमी झाला, यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथेच त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर रामभाई यादव यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भावाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय यादव यास तात्काळ अटक केली आहे. तसंच पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. विजय आणि राजू हे 22 ते 30 या वयोगटातील आहेत. घरामध्ये जेवायला बसलेले असताना दोघांमध्ये वाद झाले. शिवी का दिली? म्हणून विजयने राजूवर हल्ला केला.
